Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भरधाव फॉर्च्यूनरने धडक दिल्याने तरुण ठार; आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याला अटक

भरधाव फॉर्च्यूनरने धडक दिल्याने तरुण ठार; आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याला अटक



सोलापूर : खरा पंचनामा

जुन्या पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे (ता. आंबेगाव) येथे घोड नदीच्या पुलाच्या दक्षिण दिशेला शनिवारी (ता.२२) रात्री साडेनऊच्या सुमारास फॉर्च्यूनर गाडीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ओम उर्फ बंटी सुनील भालेराव (वय २०) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.

याप्रकरणी मंचर पोलिसांनी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर साहेबराव मोहीते (रा. मोहीतेवाडी शेलपिंपळगाव ता. खेड) याला ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पुण्यासह देशभरात कल्याणी नगर अपघात प्रकरण गाजले. भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर एकलहरे येथे घडलेल्या घटनेमुळे नागरिक संतप्त होऊन मंचर पोलीस ठाण्यावर गेले होते. आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर जमाव तेथून निघून गेला. ओमचे चुलते नितीन रामचंद्र भालेराव (रा. कळंब-सहाणेमळा ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शनिवारी रात्री कळंब गावातून जुन्या रस्त्याने मंचरच्या दिशेने भरधाव फॉर्च्यूनर (एम.एच.१४ के.जे.७५५७) गाडी येत होती. पिकअपला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने घरी जात असलेल्या ओमच्या दुचाकीला फॉर्च्यूनरने धडक दिली.

त्यामुळे ओम रस्त्यापासून दहा ते बारा फुट फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरु झाला. तसेच डावा डोळा, तोंडाला, ओटांवर व हनवटीला गंभीर दुखापत झाली.

जखमीला शुभम भालेराव, सचिन वायाळ, शैलेश भालेराव यांच्यासह स्थानिक नागरिकांनी रुग्णावाहिकेतून मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातानंतर मयूर मोहिते यांनी मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला. असा गावकऱ्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे गावकरी संतप्त झाले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.