२४ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी नगरपंचायतीच्या लिपिकावर गुन्हा
कडेगावमध्ये सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सलग दुसऱ्या दिवशी कारवाई
सांगली : खरा पंचनामा
भावाने खरेदी केलेल्या जमिनीचे गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देण्यासाठी २४ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी कडेगाव नगरपंचायतीच्या लिपिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. बुधवारी समाजकल्याण अधिकारी आणि निरीक्षकाला अटक केल्यानंतर आज एसीबीने सलग दुसऱ्या दिवशी कारवाई केली आहे.
सागर रामचंद्र माळी (वय ३२) असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचे नाव आहे. तक्रारदाराच्या भावाने कडेगाव नगरपंचायतीच्या हद्दीत जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीचे गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देण्यासाठी २४ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदारांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लिपीक माळी याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुरुवारी लिपीक माळी याच्याविरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास माझ्याशी थेट 9821880737 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाने निरीक्षक दत्तात्रय पुजारी, प्रितम चौगुले, अजित पाटील, ऋषीकेश बडणीकर, धनंजय खाडे, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.