Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चारित्र्याचा संशय घेत असल्याने पत्नी, मुलीने काढला पतीचा काटा पत्नीसह तिघांना अटक शिराळ्यातील सुटकेसमधील मृतदेहाचे गूढ उकलले : पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची माहिती

चारित्र्याचा संशय घेत असल्याने पत्नी, मुलीने काढला पतीचा काटा पत्नीसह तिघांना अटक 
शिराळ्यातील सुटकेसमधील मृतदेहाचे गूढ उकलले : पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची माहिती



सांगली : खरा पंचनामा

शिराळ्यातील बायपास रस्त्यावरील सुरले वस्तीजवळ सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. चारित्र्याचा संशय घेत असल्याने पत्नीनेच मुलगी आणि नातेवाईकाच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पत्नीसह पलूस येथील मृताच्या नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे. हा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पथकास बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

देवराज उर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे (वय २४, रा. रूक्मिणीनगर, ता. कराड, मूळ रा. शेवाळेवाडी, ता. कराड), साक्षी राजेश जाधव उर्फ साक्षी विनायक काळुगडे, शोभा राजेश जाधव (दोघीही रा. पलूस) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राजेश वसंतराव जाधव (वय ५३, रा. पलूस) असे मृताचे नाव आहे. दि. २० मे रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास शिराळ्यातील बायपास रस्त्यावरील सुरले वस्तीजवळ असणाऱ्या साकव पुलाच्या खाली सुटकेसमध्ये नायलॉनच्या दोरीने गळा आणि हात-पाय बांधलेला मृतदेह पोलिसांना सापडला होता. मृतदेह सडल्याने त्याची ओळख पटवताना पोलिसांना अथक प्रयत्न करावे लागत होते.  

इस्लामपूरचे पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची विविध पाच पथके तयार करून विविध भागात पाठवली होती. मृतदेहाच्या अंगावरील कपडे आणि सुटकेसवरून पोलिस मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पथकांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा आदि ठिकाणी प्रवासी बॅगा तयार करणाऱ्यांची माहिती काढून त्यांनी विक्री केलेल्या व्यापाऱ्यांची माहिती काढली. त्यामध्ये एक बॅग पलूस येथील व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी आल्याचे पथकाला समजले. संबंधित विक्रेत्याला शोधून काढून त्याच्याकडून खरेदीदाराचे रेखाचित्र काढून घेण्यात आले. त्याच्याकडील चौकशीनंतर हा मृतदेह राजेश जाधव यांचा असल्याचे स्पष्ट झाले. 

त्यानंतर पोलिसांनी जाधव यांचे नातेवाईक देव्या शेवाळे, साक्षी जाधव, शोभा जाधव यांच्याकडे राजेश यांच्याबाबत चौकशी केली. त्यांच्या जबाबात विसंगती दिसून आली. त्यामुळे तिघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृत राजेश व्यसनाधीन होता. त्यातून तो पत्नी शोभाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्याला कंटाळून या तिघांनी फेब्रुवारी महिन्यात त्यांचा खून करून तो सुटकेसमधून घालून ती सुटकेस शिराळा येथे टाकून दिली होती अशी कबुली दिली. त्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली. 

पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त अधीक्षक रितू खोकर, इस्लामपूरचे उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शिराळ्याचे निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, प्रवीण साळुंखे, युवराज सरनोबत, अनिता मेनकर, सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक कुमार पाटील, कालीदास गावडे, शशिकांत शिंदे, नितीन यादव, शरद जाधव, शरद बावडेकर, अमर जाधव, सचिन धोतरे, संदीप पाटील, उदय माळी, सोमनाथ गुंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.