राज्यात फडणवीसच 'बॉस'! भाजपात कोणताही फेरबदल नाही
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभेचे निकाल आल्यानंतर भाजपाला केंद्रात स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करण्याएवढे बहुमत मिळालेले नाही. तर महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीला कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राजकारणात उलथापालथ झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या खराब कामगिरीनंतर पक्ष राज्यातील संघटनेत मोठे फेरबदल होतील, असे मानले जात होते.
मात्र, मंगळवारी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत झालेल्या महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील भाजपच्या राजकीय नेतृत्वात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्र भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कुठलेही बदल केले जाणार नाही, अस स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिले. त्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, ' भाजपच्या महाराष्ट्राच्या कोअर कमिटीची बैठक ही केंद्रीय नेतृत्वासोबत झाली. नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कुठली मतं कशी मिळाली, कुठे चांगली मते मिळाली, कुठे कमी मिळाली, त्याची कारणे काय-काय होती, त्यावर काय-काय मुद्द्यांचा इम्पॅक्ट होता, अशा सगळ्या मुद्द्यांची चर्चा झाली.
त्यासोबत येत्या विधानसभेचा रोडमॅप यावरही आम्ही प्राथमिक चर्चा केली. कुठल्याही परिस्थितीत आपल्या महायुतीच्या सर्व घटकपक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून आणता येईल, या संदर्भात आम्ही एक रोडमॅप तयार केला आहे. याचसोबत आता लवकरच घटक पक्षांसोबत चर्चा करुन अत्यंत मजबुतीनं आपल्याला निवडणुकीत कसं पुढे जाता येईल, याबाबतची सर्व कार्यवाही आम्ही येत्या काळात करणार आहोत', अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.