दहा हजारांची लाच घेताना तलाठ्याला अटक
तडसरमध्ये सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
चुलता आणि पुतण्याने एकमेकांना विक्री केलेल्या जमिनीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी तडसर (ता. कडेगाव) येथील तलाठ्याला दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. गुरुवारी दुपारी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
वैभव सुभाष तारळेकर (वय ४५, रा. तडसर रोड, कडेगाव, मूळ रा. वासुंबे, ता. तासगाव) असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार आणि त्यांच्या पुतण्याने एकमेकांना विक्री केलेल्या जमिनीची सातबाऱ्यावर नोंद करायची होती. यासाठी तलाठी तारळेकर यांनी तक्रारदारांकडे दहा हजार रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्यामध्ये तलाठी तारळेकर याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुरुवारी तलाठी तारळेकर याला दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत तारळेकर याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शासकीय तसेच निमशासकीय व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास थेट माझ्याशी 9821880737 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन उपअधीक्षक पाटील यांनी केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाने निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, प्रितम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, सुदर्शन पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रामहरी वाघमोडे, श्री. वंटमुरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.