'तुम्ही संसदेत कशासाठी आलात?
CISF च्या जवानाने थेट खासदारालाच विचारलं
नवी दिल्ली : खरा पंचनामा
डीएमकेचे राज्यसभा खासदार एम एम अब्दुल्ला यांनी राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) एका कर्मचाऱ्याने त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
अब्दुल्ला म्हणालेत की, मला संसदेच्या प्रवेश द्वाराजवळ थांबवण्यात आले आणि मला याठिकाणी येण्याचे कारण विचारण्यात आले.
एम एम अब्दुल्ला यांनी तक्रारी मध्ये म्हटलंय की, CISF जवानाने माझे संसदेत काय काम आहे? असा प्रश्न विचारल्याने मी भयभीत झालो आहे. मी याठिकाणी लोकांचे आणि तामिळनाडू राज्याचे प्रतिनिधित्व करतो. पण, मला अशा प्रसंगाला कधी सामोरं जावं लागलं नव्हतं. संसदीय सुरक्षा सेवा दल (PSS) होते त्यावेळी माझ्यासोबत असं कधीच झालं नाही.
मे महिन्यापासून CISF ने संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. यापूर्वी संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी PSS आणि दिल्ली पोलिसांची होती. संसदेमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये काहींनी घुसखोरी केली होती. घुसखोर थेट लोकसभा सभागृहापर्यंत पोहोचले होते. त्यांनी रंगाचे कॅन देखील फोडले होते. त्यानंतर संसदेची सुरक्षा PSS कडून CISF कडे देण्यात आली आहे.
अब्दुल्ला यांनी सांगितल्यानुसार, हा प्रकार १८ जून रोजी दुपारी २.४० मिनिटाला घडला. फेरी वाहनामधून मी संसदेच्या आवारात प्रवेश करत होतो. त्यावेळी मला TKR-II येथे थांबवण्यात आले. एका जवानाने मला विचारले की तुम्ही याठिकाणी कशासाठी आला आहात? तुमचं संसदेमध्ये काय काम आहे?
माझा असा विश्वास आहे की, एखादा खासदार कोणतेही काम असताना किंवा नसताना संसदेत जाऊ शकतो. मी कशासाठी संसदेत आलोय हे सभापतींना सांगण्यासाठी मी बांधिल आहे. CISF जवानाने दिलेली वागणूक वाईट होती. त्यांचा परिणाम माझ्यावर पडला आहे, असं ते म्हणाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.