मोदींचे चंद्राबाबू अन् नीतिशबाबूंना पाठिंब्याचे 'रिटर्न गिफ्ट'; आंध्रासाठी 15 हजार कोटींचे विशेष पॅकेज !
नवी दिल्ली : खरा पंचनामा
नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मसाठी पाठिंबा देऊन हातभार लावणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना अर्थसंकल्पातून 'रिटर्न गिफ्ट' देण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. बिहारमध्ये रस्ते उभारणी प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपये देण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेच्या नव्या सभागृहात मांडला. त्यात शेतकरी, युवक आणि शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मसाठी पाठिंबा देणारे 'एनडीए'तील सहकारी यांचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आंध्र प्रदेशला विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशला तब्बल 15 हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. हे पंधरा हजार कोटी रुपये यावर्षीच आंध्राला देण्यात येणार आहेत. तसेच पुढील वर्षीही अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे.
आंध्र प्रदेशमधील पोलावरम सिंचन योजना पूर्ण करण्याची ग्वाहीही अर्थसंकल्पातून मोदी यांनी चंद्राबाबूंना दिली आहे. विशाखापट्टणम-चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील कोपर्थी भागात पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. आर्थिक विकासासाठी भांडवली गुंतवणुकीसाठी एक वर्षापर्यंत अतिरिक्त वाटप केले जाणार आहे. रायलसीमा, प्रकाशम आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशातील मागास भागांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्याबरोबरच नीतिशकुमार यांनाही मोदी सरकारने खूष केले आहे. बिहारमधील रस्ते जोडणी प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. सुमारे 21 हजार 400 कोटी रुपये खर्चुन बिहारमध्ये ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये पिरपेंटी येथे 2400 मेगावॉटचा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. नवीन विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालयांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. बँकांकडून बाह्य अर्थसाहाय्य घेण्याच्या बिहार सरकारच्या विनंतीवर तातडीने निर्णय केला जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.