Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विधान परिषदेसाठी दुपारी बारापर्यंत 160 आमदारांनी केले मतदान; सर्वाधिक मतदान भाजपचे

विधान परिषदेसाठी दुपारी बारापर्यंत 160 आमदारांनी केले मतदान; सर्वाधिक मतदान भाजपचे



मुंबई : खरा पंचनामा

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज (ता. 12 जुलै) विधान भवनात मतदान सुरू आहे. दुपारी बारापर्यंत एकूण 160 आमदारांनी मतदान केले असून त्यात सर्वाधिक मतदान भाजपच्या आमदारांचे आहे.

विधान परिषदेसाठी आज सकाळपासून मतदान सुरू आहे. दुपारी बारापर्यंत सुमारे 160 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे त्यात भाजपकडून सर्वाधिक मतदान झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या एकूण आमदारांपैकी 97 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. शिंदे गटाच्या एका आमदाराने मतदान केले आहे.

भाजपपाठोपाठ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 37 आमदारांनी मतदान केले आहे. अजित पवार यांच्या गटाचे आणखी तीन आमदार मतदान करायचे राहिले आहेत. शिवाय त्यांना पाठिंबा देणाऱ्या दोन आमदारांनीही अजून मतदान केलेले नाही.

महाविकास आघाडीतील शरद पवार गटातील 12 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. काँग्रेसच्या चार, तर इतर नऊ आमदारांनीही मतदान केले आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी लवकर मतदान करून घेण्यासाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत.

विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात महायुतीकडून नऊ, तर महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महायुतीमधील भाजपने पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके आणि अमित गोरखे यांना उमेदवारी दिली आहे.

शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार कृपाल तुमाने आणि माजी खासदार भावना गवळी यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

महाविकास आघाडीकडून तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर, तर काँग्रेसने प्रज्ञा सातव, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला उमेदवार न देता शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर दिसून येत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.