"कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवले अन् पैसे लाटले'?
भाजप आमदार अडचणीत!
सातारा : खरा पंचनामा
भाजप आमदार जयकुमार गोरे मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, कोरोना महामारीच्या काळात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप करणारी याचिका त्यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर ५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दीपक अप्पासाहेब देशमुख यांनी ही याचिका दाखल केली आहे.
जयकुमार गोरे यांनी कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार केला. २०० पेक्षा जास्त मृत रुग्णांना जिवंत असल्याचं दाखवलं आणि सरकारी योजनांमधून मोठ्या प्रमाणात पैसे मिळवण्यात आले, असा गंभीर आरोप याचिकेमध्ये करण्यात आला आहे. याचिकाकर्ते दीपक देशमुख हे सातारा जिल्ह्यातील मायणी ( ता. खटाव) गावचे आहेत.
याचिकेमध्ये म्हटले आहे की, कोरोना काळात सरकारने रुग्णांचे अनेक उपचार, औषधे आणि इंजेक्शन मोफत देऊ केले होते. पण, तरी गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांकडून पैसे उकळले. उपचाराच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. याप्रकरणात गोरे यांच्या पत्नी सोनिया या देखील सहभागी आहेत. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे ५ जुलैला सुनावणी होणार आहे. मायणी-खटाव येथे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्स सेंटर आहे. हे सेंटर सातारा जिल्ह्याधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांचे उपचार करण्यासाठी ताब्यात घेतले होते. या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जयकुमार गोरे होते. याकाळात डॉक्टरांच्या खोट्या सह्या, बनावट कागदपत्रं वापरण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा गैरफायदा घेण्यात आला, असं याचिकेमध्ये म्हणण्यात आलं आहे.
याचिकेमध्ये जयकुमार गोरे यांच्याशिवाय सोनिया गोरे, खजिनदार अरुण गोरे, राकेश मेहता, महेश बोराटे, प्रवीण औताडे, अनिल बोराटे, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. सागर खाडे यांच्या नावाचा उल्लेख आहे. गोरे यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेतली जात नाहीये, असा दावा देशमुख यांनी केलाय. दरम्यान, सरकारने कोरोना केंद्राना औषधे, इंजेक्शन, कर्मचाऱ्यांचे वेतन यासाठी पैसा पुरवला होता. या काळात बोगस रुग्णांची नोंद झाल्याचं सांगण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.