मध्य रेल्वे घेणार 6 दिवसांचा मेगाब्लॉक, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणे : खरा पंचनामा
सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता मध्य रेल्वे सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेणार आहे. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या 19 गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. तर 22 एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत. यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मेगा हाल होणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सहा दिवसाचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दौंड रेल्वे स्थानकावरील विविध कामासाठी हा ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक 27 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान असणार आहे. या काळात अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत.
मध्य रेल्वेच्या या सहा दिवसांच्या ब्लॉकमुळे पुणे विभागातील 19 गाड्या रद्द करण्यात येतील. तर 22 एक्सप्रेस गाड्यांचे मार्गही बदलले जातील. यादरम्यान सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 3 दिवसांसाठी रद्द करण्यात येणार आहे. ही ट्रेन 3 दिवस रद्द केल्याने प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.
त्यासोबत सोलापूर रेल्वे विभागातून काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही गाडी 29 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान पुणे-मिरज-कुर्डवाडी मार्गे रवाना होईल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बंगळुरू एक्स्प्रेस ही गाडी ब्लॉक काळात पुणे-मिरज-कुडूवाडी मार्गे रवाना केली जाईल. त्यासोबतच बंगळुरु - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस 27 ते 31 जुलैपर्यंत कुडुवाडी-मिरज-पुणे मार्गे वळवली जाईल.
नागरकोयल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल-बल्लारी-हुबळी-मिरज-पुणे मार्गे रवाना होईल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागरकोयल ही गाडी 29 जुलै रोजी पुणे-मिरज-हुबळी- बल्लारी-गुंतकल मार्गे आणि चेन्नई - एकतानगर एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज-पुणे मार्गे धावणार आहे. मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेल्या या सहा दिवसांचा मेगाब्लॉक फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसणार आहे. तसेच यामुळे प्रवाशांचे मेगाहाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.