विवाहितेसह आईला मारहाण करुन अटक; महिला पोलिस निरीक्षकासह सात महिला अंमलदार दोषी
नाशिक : खरा पंचनामा
कौटुंबिक वादाची तक्रार देणाऱ्या विवाहितेसह तिच्या आईस मारहाण करुन दोघींविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी येथे खोटा गुन्हा दाखल करून अटक केल्याप्रकरणी महिला पोलीस निरीक्षकासह सात महिला अंमलदारांना पोलीस तक्रार प्राधिकरणने दोषी ठरविले आहे.
पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश प्राधिकरणने दिले आहेत, अशी माहिती अॅड. उमेश वालझाडे यांनी दिली.
वालझाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्राजक्ता नागरगोजे यांनी महिला सुरक्षा समितीकडे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती. ३० मार्च २०२२ रोजी समुपदेशन करताना समितीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी नांदण्यास सासरी जावे, असे प्राजक्ता यांना सांगितले. त्यांनी नकार दिल्याने समितीच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांनी प्राजक्ता यांना मारहाण केली. तसेच इतर आठ महिला कर्मचाऱ्यांनीही बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा आरोप प्राजक्ता यांनी केला. आईसह सरकारवाडा पोलीस ठाण्यात बसवून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात दोघा मायलेकींना अटक करून सहा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवले. जामीन मिळाल्यानंतर प्राजक्ता यांनी पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे आमने यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दिली.
त्याअनुषंगाने विभागाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. रुपाली लाटे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात प्राजक्ता यांच्या वतीने अॅड. उमेश वालझाडे, अॅड. प्रशांत देवरे, अॅड. राज सिंग यांनी युक्तीवाद केला. त्यात सातही महिला पोलिसांवर पदाचा गैरवापर करण्याचा ठपका ठेवण्यात आला. संबंधित सातही पोलिसांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणचे सदस्य अमित डमाळे, शामराव दिघावकर यांनी दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.