कोयत्याने मारहाण करून मोबाईल, दागिने चोरणाऱ्या तिघांना अटक
३४ हजारांचा मुद्देमाल जप्त, विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील विश्रामबाग येथील इंदिरानगर येथे मध्यरात्री तरूणाला कोयत्याने मारहाण करून मोबाईल आणि दागिने चोरणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पाच मोबाईल, दागिने असा ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली.
श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे (वय २४, रा. देशिंग, ता. कवठेमहांकाळ), विशाल मुरारी निशाद (वय २३, रा. विठ्ठलनगर, सांगली, मूळ रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश), राकेश शिवलिंग हादिमणी (वय २४, रा. इंदिरानगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. १६ जुलै रोजी मध्यरात्री शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी येथे अरबाज जमादार (वय २४, रा. हनुमाननगर) याला तिघांनी अडवून कोयत्याने मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल दागिने काढून घेतले होते. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयितांना तातडीने पकडण्याच्या सूचना पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार विश्रामबाग गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक संशयितांचा शोध घेत होते. त्यावेळी पथकातील संकेत कानडे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांना हा गुन्हा वरील तीन संशयितांनी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. तसेच तिघेही धामणी रस्त्यावरील एका रूग्णालयाजवळ बसल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मोबाईल चोरीचे अन्य गुन्हेही उघडकीस आणण्यात आले. त्यांच्याकडून पाच मोबाईल, सोन्याची चेन जप्त करून त्यांना अटक करण्यात आली.
विश्रामबागचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक मारूती साळुंखे, संदीप साळुंखे, बिरोबा नरळे, संकेत कानडे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, अतुल खंडागळे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.