Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्वतःच्याच घरात चोरी करणाऱ्याला अटक १०.६० लाखांची रोकड जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

स्वतःच्याच घरात चोरी करणाऱ्याला अटक
१०.६० लाखांची रोकड जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

भाच्याने विश्वासाने ठेवायला दिलेली रक्कम खर्च करून ती परत द्यायला लागू नये यासाठी स्वतःच्याच घरात चोरी करून त्या चोरीची फिर्याद देणाऱ्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १०.६० लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. वांगी (ता. कडेगाव) येथे ही घटना घडली होती.  
 
किरण सिताराम कुंभार (वय ४२, रा. सुतार मळा, वांगी, ता. कडेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. १६ जुलै रोजी कुंभार याच्या घरात अज्ञातांनी चोरी करून १५.२० लाखांची रोकड लंपास केल्याची फिर्याद किरण कुंभार याने चिंचणी वांगी पोलिस ठाण्यात दिली होती. या चोरीचा तातडीने तपास करून चोरट्यांना अटक करण्यासाठी निरीक्षक सावंत यांनी सहायक निरीक्षक नितीन शिंदे यांचे एक पथक तयार केले होते. पथक तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत होते. 

त्यावेळी पथकाला ही चोरी किरण कुंभार यानेच केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. तसेच ती रोकड घरातच लपवून ठेवल्याचीही माहिती मिळाली. पथकाने कुंभार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी कुंभार याच्या भाच्याने ती रोकड विश्वासाने काही दिवस घरात ठेवण्यासाठी दिली होती. तसेच त्यातील काही रक्कम कुंभार याने खर्च केली होती. ती रक्कम भाच्याला परत द्यायला लागू नये यासाठी ती रक्कम घरात लपवून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून घरात चोरी झाल्याची तक्रार चिंचणी वांगी पोलिस ठाण्यात दिल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून त्याने घरात लपवलेली १०.६० लाखांची रक्कम जप्त करण्यात आली. त्याला चिंचणी वांगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, नितीन सावंत, अनिल ऐनापुरे, सचिन धोत्रे, अरूण पाटील, श्रीधर बागडी, अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, रोहन घस्ते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.