Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रेणावीत उसाच्या शेतातील १०० किलो गांजाची झाडे जप्त एकाला अटक, विटा पोलिसांची कारवाई

रेणावीत उसाच्या शेतातील १०० किलो गांजाची झाडे जप्त
एकाला अटक, विटा पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

खानापूर तालुक्यातील रेणावी गावच्या हद्दीत उसाच्या शेतात लावलेली १०० किलो वजनाची गांजाची तीन ते पाच फूट उंचीची झाडे जप्त करण्यात आली. बाजारात याची किंमत १०.७ लाख इतकी आहे. याप्रकरणी शेताचा मालकाला अटक करण्यात आली आहे. बुधवारी पहाटे विटा पोलिसांनी ही कारवाई केली. 

राजाराम आनंदा गुजले (वय ५०, रा. रेणावी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अंमली पदार्थाचे उत्पादन, तस्करी, विक्री करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना विट्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. पथक अशा व्यक्तींच्या शोधात होते. त्यावेळी रेणावी येथे उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली. 

त्यानंतर विटा पोलिसांनी फौजफाट्यासह रेणावी येथे गुजले याच्या शेतात छापा टाकला. त्यावेळी उसासह अन्य पिकांमध्ये गांजाची लहान मोठी अशी २४० झाडे सापडली. त्याचे वजन १०० किलो भरले. बाजारात याची किंमत १० लाख ७ हजार रूपये आहे. गांजाची झाडे जप्त करून शेताचा मालक गुजले याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विट्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक विशाल येळेकर, किरण खाडे, उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, विलास मोहिते, महादेव चव्हाण, गणपत गावडे, प्रमोद साखरपे, अमोल नलवडे, महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.