सराफी दुकानात डल्ला मारणाऱ्या चोरट्याला अटक
९० हजारांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथील सराफी दुकान फोडून दागिने चोरणाऱ्या कर्नाटकातील चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचे ९० हजारांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
अबरारहुसेन गुलाबरसूल बेग (वय ३०, रा. कुडची, जि. बेळगाव, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. ५ एप्रिल रोजी शेडगेवाडी येथील तुषार माळी यांच्या सराफी दुकानात अज्ञाताने चोरी करून दागिने लंपास केले होते. याप्रकरणी कोकरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तातडीने तपास करून संशयिताना अटक करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते.
पथकातील सागर लवटे यांना बेग हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी कुपवाड फाटा येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता. बेग तेथे आल्यानंतर त्याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या पॅंटच्या खिशात सोन्याचे दागिने सापडले. त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने शेडगेवाडी येथील सराफी दुकानातून ते चोरल्याची कबुली दिली. दागिने जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याला कोकरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सागर लवटे, अमर नरळे, उदयसिंह माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.