राधेश्याम मोपलवारांची 'समृद्धी' महायुतीला शॉक देणार?
मुंबई : खरा पंचनामा
एखाद्या आयएएस अधिकाऱ्याकडे किती संपत्ती असू शकते? आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपानुसार समृद्धी महामार्गाच्या बांधणीत महत्वाची भूमिका बजावणारे आयएएस अधिकारी राधेशाम मोपलवार यांनी 3000 कोटी रुपये कमावले आहेत. त्यांनी आयएएस म्हणून 26 वर्षे सेवा बजावली आहे. या 26 वर्षांत कुंपणानेनच शेत खाल्ले, असा प्रकार मोपलवार यांनी केल्याचे समोर येत आहे.
मोपलवार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या देखरेखीखाली समृद्धी महामार्गाची बांधणी झाली आहे. मोपलवार यांनी 3000 कोटींची माया गोळा केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. हा आरोप महायुती सरकारला शॉक देणारा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोपलवार यांच्या संपत्तीचे असेच चक्रावून टाकणारे आकडे सांगितले आहेत. समृद्धी महामार्गाच्या बांधणीच प्रशासकीय अधिकारी म्हणून महत्वाची भूमिका बजावणारे मोपलवार यांची कंत्राटांच्या माध्यमातून 3000 कोटी रुपयांची माया गोळा केली आहे, असा आरोप आमदार पवार यांनी केला आहे.
मोपलवारांच्या दुसऱ्या पत्नीकडे दीडशे कोटी, तिसऱ्या पत्नीकडे तीनशे कोटी आणि मुलींची संपत्ती 850 कोटी रुपयांची आहे. आमदार रोहित पवार यांनी सांगितलेली ही आकडेवारी लोकांना चक्रावून टाकणारी आहे. शिवसेनेचे आमदार फोडण्यासाठी मोपलवारांच्या पैशांचाच वापर केला का, असा भाजपच्या जिव्हारी लागणारा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
समृद्धी महामार्ग विविध कारणांनी वादात राहिला आहे. समृद्धी महामार्गाचे चार महिन्यांत पुन्हा टेंडर काडण्यात आले. ते 55 हजार कोटी रुपयांवर गेले. हे कशासाठी करण्यात आले, याचा उलगडा आता रोहित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर झाला आहे. रोहित पवारांनी एका कंत्राटाचा उल्लेख केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधेश्याम मोपलवार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, मात्र 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जुजबी कारवाई करून त्यांच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी सोपवली होती, असाही आरोप आमदार पवार यांनी केला आहे.
मोपलवार आता सेवानिवृत्त झाले आहेत. ते सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉररूमचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत, याकडेही आमदार पवार यांनी लक्ष वेधले आहे. मोपलवार यांच्या नावे 1500 कोटींची मालमत्ता असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले.
आमदार पवार यांनी केलेल्या आरोपांमुळे महायुती सरकारची प्रतिमा मलिन होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर महायुतीसाठी हा मोठा झटका आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत समाजात फारसे चांगले बोलले जात नाही, ते का बोलले जात नाही, याचे आणखी एक सबळ कारण रोहित पवार यांच्या आरोपांमुळे समोर आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.