Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कारवाई टाळण्यासाठी तीन लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

कारवाई टाळण्यासाठी तीन लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ



पुणे : खरा पंचनामा

दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. तानाजी सर्जेराव शेगर असे या पोलीस उप निरीक्षकाचे नाव आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयातील चंदननगर पोलीस ठाण्यात ते नेमणुकीस होते. याप्रकरणी 17 मे रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यासंदर्भात महावितरण विभागात काम करणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार व्यक्तीविरोधात मीटर चोरी केल्याचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तानाजी शेगर यांच्याकडे होता. पुढील कारवाई टाळण्यासाठी तानाजी शेगर यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड अंती तीन लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती. त्यानंतर एसबीने केलेल्या तपासात तानाजी शेगर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांच्याविरोधात चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तानाजी शेगर यांना 19 मे रोजी निलंबित केले होते.

दरम्यान, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत होते. चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तानाजी शेगर यांना वेळोवेळी समजपत्र बजावण्यात आले. मात्र, जेव्हा जेव्हा समजपत्र घेऊन कर्मचारी घरी जात होते, त्या त्या वेळी तानाजी शेगर घरी हजर नव्हते. त्यामुळे एकतर्फी चौकशी होऊन त्यामध्ये तानाजी शेगर दोषी आढळले. त्याशिवाय तानाजी शेगर यांच्याकडे असलेल्या तपासाच्या गुन्ह्याची त्यांनी हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या सर्व घटना पाहता तानाजी शेगर यांच्या वर्तवणुकीमुळे पोलीस दलाची प्रतीमा मलीन झाली आहे. त्यामुळे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 25 व 26 मधील तसेच भारतीय राज्यघटना 311 (2) (ब) अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस उपनिरीक्षक तानाजी सर्जेराव शेगर यांना शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.