Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ट्रक चोरून त्याचा बनाव करणाऱ्या दोघांना अटक ७.१० लाखांचे दोन ट्रक जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

ट्रक चोरून त्याचा बनाव करणाऱ्या दोघांना अटक
७.१० लाखांचे दोन ट्रक जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

चुलत्याच्या नावे घेतलेला ट्रक चोरीला गेल्याची फिर्याद द्यायला लावून चोरीला गेलेला ट्रक वापरणाऱ्या पुतण्यासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ७.१० लाख रूपये किमतीचे चोरीचे दोन ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. 
 
बिरदेव बाळू गडदे (वय २६, रा. गौंडवाडी, सांगोला), गणेश अनिल भोसले (वय ३२, रा. रमामातानगर, सांगली) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. संशयित बिरदेव गडदे याला ट्रक घेण्यास फायनान्स मिळाला नसल्याने त्याने चुलते यशवंत गडदे यांच्या नावे फायनान्स करून ट्रक (एमएच ५० ४८७५) घेतला होता. त्या ट्रकचे हप्ते थकित राहिल्याने बिरदेव आणि त्याचा साथीदार गणेश भोसले याने तो ट्रक मोहन शेंबडे यांना विकला. नंतर गणेशच्या मालकीचा ट्रक (एमएच १० झेड ४५८४) या ट्रकला गडदे यांच्या ट्रकचा आरटीओ क्रमांक लावला.  

त्यानंतर भोसले याचा नंबर बदलेला ट्रक काही काळ मिरज-पंढरपूर रस्त्यावरील एका ढाब्याजवळ लावला. नंतर तो सांगलीतील विश्रामबाग येथील ट्रक अड्ड्यावर आणून लावला. त्यानंतर बिरदेवने चुलते यशवंत गडदे यांना ट्रक चोरीला गेल्याची खोटी फिर्याद द्यायला लावली. त्यानंतर याचा तपास एलसीबीचे पथक करत होते. पथकाला चोरीला गेलेला ट्रक विश्रामबाग येथील ट्रक अड्ड्यावर असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन पाहणी केल्यानंतर ट्रक सापडला. तसेच ट्रकजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या बिरदेव गडदे आणि गणेश भोसले यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करून दोन्ही ट्रक जप्त करण्यात आले. दोघांनाही मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, अमोल ऐदाळे, आमसिद्ध खोत, अमर नरळे, बाबासाहेब माने, रोहन गस्ते, अजय बेंदरे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.