खेडकर कुटुंबियांची पंकजा मुंडेंच्या ट्रस्टला लाखोंची देणगी; देवीला चांदीचा मुकूट !
पुणे : खरा पंचनामा
आपल्या कारनाम्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या समोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच आता खेडकर कुटूंबाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी खेडकर कुटुंबियांचे संबध असल्याचे समोर आले आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान ट्रस्टला मनोरमा खेडकर यांनी तब्बल 12 लाख रूपयांची देणगी दिल्याचे स्पष्ट झालं आहे.
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून पूजा खेडकर यांची राज्य सरकारने गेल्या वर्षी नियुक्ती केली होती. या पदावर नियुक्ती झाल्यापासून खेडकर यांनी आपल्या विविध कारनामे केले असल्याची माहिती राज्य सरकारकडे पाठविलेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हा अहवाल पाठविला होता. नियुक्तीच्या ठिकाणी स्वतंत्र केबीन पाहिजे, त्यामध्ये अद्यावत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी त्या आग्रही होत्या. आपल्या खासगी ऑडी कारवर सरकारी लाल-निळा अंबर दिवा लावून खेडकर फिरत असल्याचेही या अहवालामध्ये म्हंटले होते.
आपल्या चुकीच्या कारभारामुळे चर्चेत आलेल्या पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबाला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, याची चर्चा हे प्रकरण सुरू झाल्यापासून सुरू आहे. त्यातच आता खेडकर कुटुंबाने पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला लाखो रुपयांची देणगी दिल्याचं समोर आले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चेकद्वारे ऑक्टोबर 2023 मध्ये ही देणगी देण्यात आली आहे.
तसेच पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, म्हणून पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला चांदीचा मुकुट दिला होता. त्याचे व्हिडीओ आणि फोटो देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.