IAS पूजा खेडकरांच्या कारने वाहतुकीचे तब्बल २१ नियम मोडले, २७ हजारांची दंडवसुली थकित
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील प्रोबेशनरी (प्रशिक्षणार्थी) सनदी अधिकारी पूजा खेडकर या सध्या देशभर चर्चेत आहेत. त्यांची नुकतीच पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या कारनाम्यांमुळेच त्यांना वाशिमला जावं लागलं आहे.
पूजा खेडकर यांनी चमकोगिरी केल्याने त्यांची बदली झाली आहे. व्हिआयपी नंबरप्लेट असलेल्या ऑडी कारला लाल आणि निळा दिवा लावणे, पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच निवासी जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्स अॅप मेसेज करुन स्वतःसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, कार, निवासस्थान आणि शिपाई यासंबंधीची मागणी वारंवार करणे. परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून त्यांनी त्यांच्या मागण्या करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांची आता वाशिमला बदली करण्यात आली आहे.
पूजा खेडकर यांच्या चमकोगिरीच्या गोष्टी राज्यभरात चघळल्या जात असतानाच त्यांचा आणखी एक प्रताम समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुण्यात वास्तव्यास असताना पूजा खेडकर ज्या ऑडी कारचा वापर करत होत्या त्या कारवर अनेक दंड (चालान) ठोठावण्यात आले आहेत.
पूजा खेडकर वापरत असलेली कार त्यांच्या खासगी अभियांत्रिकी कंपनीच्या नावाने नोंदणीकृत असल्याचं पोलीस तपासांत निष्पन्न झालं आहे. या कारवर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी २१ तक्रारींची नोंद आहे. तसेच या कारवर २७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, जो अद्याप वसूल केलेला नाही. कारण पुणे पोलिसांनी अद्याप त्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.