पूजा खेडकर पॅटर्न राज्यातही; दोन उपजिल्हाधिकाऱ्यांनी MPSC ला गंडवलं !
मुंबई : खरा पंचनामा
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे राज्यासह देशात खळबळ माजली असताना राज्यातही असाच फसवणुकीचा प्रकार घडल्याचा खळबळजनक दावा राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, सध्या सेवेत असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी खोटी प्रमाणपत्रे मिळवून एमपीएससीला गंडवले आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, आयएएस पूजा खेडकर यांनी यूपीएससीला जसं गंडवलं, अगदी तसाच प्रकार राज्यात एमपीएससीच्या बाबतीत घडला आहे. वडेट्टीवार यांनी राज्यातील दोन अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांच्याविरोधात तक्रारही केली आहे. वडेट्टीवार म्हणाले, पूजा खेडकरवर केंद्र सरकार तसेच यूपीएससीकडून कारवाई सूरू झाली आहे. मात्र एमपीएससीला गंडवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही.
त्यांनी राज्यातील दोन अधिकाऱ्यांची नावे घेतली. त्यांची नावे आहेत. माधुरी कल्याण नष्टे व अजय कल्याण नष्टे. या दोघांनी दिव्यांग असल्याचं सांगत एमपीएससीला गंडवलं, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. हे दोघेही उपजिल्हाधिकारीपदावर कार्यरत आहेत. माधुरी नष्टे सातारा येथे उपजिल्हाधिकारी तर अजय नष्टे सांगली येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे की, या दोघांनीही ८० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवले आहे. त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असून, या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी शासकीय नोकरी मिळवली आहे. या दोघांच्याही दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करून त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला केंद्रीय लोकसेवा आयोगानं मोठा दणका दिला आहे. यूपीएससीनं तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून नागरी सेवा परीक्षा - २०२२ मधील तिची उमेदवारी रद्द का करू नये अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भविष्यात तिला पुन्हा परीक्षा देण्यास बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर ही २०२२ च्या बॅचची महाराष्ट्र केडरची आयएएस अधिकारी आहे. परीक्षा पास झाल्यानंतर ती प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.