दहीहंडी सणाला गालबोट!
मुंबईत थरावरुन कोसळून 15 गोविंदा जखमी
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगली आहे. मुंबईत जल्लोषात दहीहंडीचा उत्साह सुरु असताना दुसरीकडे थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामुळे दहीहंडी सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत आतापर्यंत 15 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दुपारी 12 वाजेपर्यंत विविध पथकातील 15 गोविंदा जखमी झाले आहे. या सर्व गोविंदांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात मुंबईतील केईएम रुग्णालयात 1, नायर रुग्णालयात 4, सायन रुग्णालयात 2, सेंट जॉर्ज हॉस्पिटलध्ये 1, पोद्दारमध्ये 4, राजावाडीमध्ये 1, एमटी अगरवार रुग्णालयात 1 आणि कुर्ला भाभा रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.
या सर्व जखमी गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सध्या या सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात. या गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारबरोबरच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. गेल्या दोन वर्षांत जखमी गोविंदांची संख्या 200 वर पोहचली आहे.
तरुण गोविंदा मोठ्या प्रमाणात जखमी होत असल्याने व त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारच्या तसेच महानगरपालिकेची केईएम, शीव, नायर व कूपर ही रुग्णालये सज्ज झाली आहेत. नायर रुग्णालयामध्ये ट्रॉमा, शल्यचिकित्सा विभाग आणि अस्थिव्यंगशल्य चिकित्सा विभागात जखमी गोविंदांसाठी 8 ते 10 खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, आवश्यक सर्व औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.