Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

केरेवाडीत दरोडा टाकणाऱ्या चौघांना अटक १.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त : विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती निलजीतील बलात्कार, दरोड्यातील संशयितांची नावे निष्पन्न

केरेवाडीत दरोडा टाकणाऱ्या चौघांना अटक
१.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त : विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती
निलजीतील बलात्कार, दरोड्यातील संशयितांची नावे निष्पन्न



सांगली : खरा पंचनामा


कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी (आरेवाडी) येथील दरोडाप्रकरणी चार संशयितांना अटक करून एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय निलजी (ता. मिरज) येथे महिलेवर बलात्कार करून जबरी चोरी करणाऱ्यांची नावे निष्पन्न झाली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.  
 
चारशिट्ट्या भिमा शिंदे (वय ५७, रा. लिंगनूर, ता. मिरज), विनोद उर्फ उद्देश सुभाष पवार (वय २३), श्रीनाथ सुभाष पवार (वय १९), विष्णू सुभाष पवार (वय २०, तिघेही रा. भोसे, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. २८ जुलै रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास केरेवाडी (आरेवाडी) येथे दरोडा टाकण्यात आल्याची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना डायल ११२ वरून देण्यात आली. कवठेमहांकाळचे निरीक्षक जोतिराम पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत चोरटे दोन दुचाकीवरून सांगलीकडे निघाले होते. याची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असणारे मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा आणि निरीक्षक पाटील यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. 

पोलिस पाठलाग करत असताना दोघेजण दुचाकी घसरून खाली पडले. त्यानंतर ते रस्त्याशेजारील शेतात पळून गेले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचे आवाहन केले. मात्र ते पळत असल्याने उपअधीक्षक गिल्डा यांनी चोरट्यांच्या दिशेने हवेत गोळीबार केला. नंतर पोलिसांनी पाठलाग करून चारशिट्ट्या शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर अन्य संशयितांची नावे निष्पन्न झाली. त्यांना अटक करून त्यांच्याकडील दोन दुचाकी, दागिने, चाकू, कात्री, बॅटरी असा १.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले. 

मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, जतचे उपअधीक्षक सुनिल साळुंखे, एलसीबीचे निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मागर्दशर्नाने कवठेमहांकाळचे निरीक्षक जोतिराम पाटील, मिरज ग्रामीणचे निरीक्षक भैरू तळेकर, सहायक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्यासह पोलिस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली.  

निलजीतील बलात्कार, दरोड्यातील नावे निष्पन्न
निलजी (ता. मिरज) येथे एका महिलेवर बलात्कार करून जबरी चोरी करणाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यातील संशयितांना शोधण्यासाठी विविध ठिकाणी पोलिस पथके पाठवण्यात आली आहेत. यातील संशयितांना लवकरच अटक करू असेही महानिरीक्षक फुलारी यांनी यावेळी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.