अश्विनी बिद्रे हत्याकांडः वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तपासात ढिलाई केली, सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवाद
पनवेल : खरा पंचनामा
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांनी तपासात ढिलाई केली. सुमारे चार महिने त्यांनी कोणताही तपास केला नाही. त्यामुळे याप्रकरणी लवकर गुन्हा दाखल झाला नाही, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्यासमोर केला आहे.
विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नुकत्याच झालेल्या तारखेला युक्तिवाद करताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. अश्विनी बेपत्ता झाल्यानंतर प्रथम कळंबोली पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरवसे यांच्याकडे देण्यात आला होता. नंतर तो तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांच्याकडे गेला. मात्र पोपेरे यांनी कोणताही तपास केला नाही. त्यांनी तपासात कमालीची ढिलाई केली. अनेक उणिवा ठेवल्या आहेत. सुरुवातीला योग्य दिशेने तपास न झाल्यामुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब झाला. हा सर्व खटाटोप आरोपींची पाठराखण करण्यासाठीच होता, असेही प्रदीप घरत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
अश्विनी बिद्रे हत्याकांड खटला आता अंतिम टप्प्यात आला आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवाद संपल्यानंतर आरोपींचे वकील विशाल भानुशाली यांचा अंतिम युक्तिवाद सुरू होणार आहे. या खटल्याचा निकाल वेळेत लावण्यासाठी पनवेल न्यायालयाने सुनावणीसाठी विशेष वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार पुढील सुनावणी आता येत्या शुक्रवारी आणि शनिवारी लागोपाठ दोन दिवस होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.