निलजी येथील चोरी, बलात्कारप्रकरणी एकाला अटक
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
निलजी (ता. मिरज) येथे महिलेवर बलात्कार करून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्याच्या अन्य तीन साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
गजपती शिसफूल भोसले (वय ३०, रा. आंबेडकरनगर, बोलवाड, ता. मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. २६ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास चौघे संशयित पीडित महिलेच्या घरात घुसले. त्यावेळी त्यांनी महिला आणि तिच्या पतीला मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर त्यातील एकाने महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक नितीन सावंत, सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक संशयितांचा शोध घेत असताना या घटनेतील संशयित गजपती भोसले लिंगनूर-बेळंकी रस्त्यावरील जलसंपदा कार्यालयाजवळ तो येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून तेथे त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याच्यासह त्याच्या तीन साथीदारांनी निलजी येथील चोरी आणि बलात्काराच्या घटनेची कबुली दिली. त्याला अटक करून मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एलसीबीचे निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक नितीन सावंत, सिकंदर वर्धन, रूपाली ठोंबरे, अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, इम्रान मुल्ला, आमसिद्ध खोत, रोहन गस्ते, अजय बेंदरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.