आश्रमचालकाकडून आश्रयास असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
राज्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. बदलापूरच्या घटनेने खळबळ माजली असतानाच नालासोपारा व वसईमधूनही अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. आता तशीच घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे.
आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आश्रमचालकानेच या मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे घडला आहे.
दादासाहेब अकोलकर (वय ६७) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला जेरबंद करण्यात आले आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारात असलेल्या आश्रमात ही घटना घडली. या आश्रमात गेल्या १० वर्षांपासून आध्यात्मिक शिक्षण, वादन, गायनाचे प्रशिक्षण दिले जाते. आश्रमातील मुली जवळच असलेल्या एका शाळेत शिक्षण घेतात आणि शाळा सुटल्यानंतर आश्रमात परत येतात.
आश्रमचालक दादासाहेब पुंडलिक अकोलकर याने २० ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी आश्रमात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना आपल्या खोलीत बोलावले व त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले व याची वाच्यता केल्यास आश्रमातून हाकलून देण्याची धमकी दिली.
या प्रकाराने घाबरलेल्या मुलींनी दोन दिवस याची कुठेही वाच्यता केली नाही. त्यांच्याकेड मोबाईल नसल्याने आणि आश्रमचालकाची दहशत असल्याने त्या गप्प होत्या. त्यानंतर त्यांनी आपल्या पालकांना याबद्दल सांगितले. पीडिताच्या पालकांनी आज आश्रमात येऊन आश्रमचालक दादा महाराज अकोलकर यास जाब विचारला मात्र त्याने उडवाउडवीची उतरे दिली. याप्रकरणी पीडित मुलींच्या फिर्यादीवरून दादासाहेब पुंडलिक अकोलकर ऊर्फ दादा महाराज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.