Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कारसह १०.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एक्साईजची कारवाई

गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
कारसह १०.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एक्साईजची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा दारूची तस्करी करून ती सांगली जिल्ह्यासह परिसरात बनावट ब्रॅंडच्या नावे विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. याप्रकरणी कवठेमहांकाळ येथील तिघांसह एकूण सातजणांना अटक करण्यात आली आहे. सांगलीतील विजयनगर चौक परिसरात केलेल्या कारवाईत त्यांच्याकडून एका आलिशान कारसह १०.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.  
 
अब्दुलरझाक नजरूद्दीन मुलाणी (वय २६), महमंदकैफ बशिर बागवान (वय २०), सिद्दीक मुबारक नदाफ (वय १८, तिघेही रा. कवठेमहांकाळ) यांच्या दारू तस्करीत गुंतलेले चौघे असे सातजणांना अटक करण्यात आली आहे. तपासाच्या कारणास्तव अन्य चौघांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. सांगलीतील काहीजण गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करून ती ती दारू अन्य कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये भरून त्याची विक्री करत असल्याची माहिती अधीक्षक पोटे यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यांनी भरारी पथकाचे निरीक्षक राजकुमार खंडागळे याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. 

त्यानुसार निरीक्षक खंडागळे यांचे पथक तस्करांवर वॉच ठेवून होते. त्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात आली. काही दिवसांपूर्वी संशयित एका कारमधून (एमएच १३ सीएस ०७९५) संशयित येत असल्याचे पथकाला दिसून आले. विजयनगर चौक परिसरात पथकाने ती कार अडवली. त्यावेळी कारची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गोवा बनावटीची दारू सापडली. कार जप्त करून तिघांना अटक करण्यात आली. कोठडीदरम्यान त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर विजयनगर येथील एका फ्लॅटमध्ये दारूचा साठा केल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे छापा टाकून गोवा बनावटीची दारू जप्त केली. याप्रकरणी अन्य चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाने भरारी पथकाचे निरीक्षक राजकुमार खंडागळे, अजितकुमार नायकुडे, विनायक जगताप, दुय्यम निरीक्षक युवराज कांबळे, सुवास पोळ, रमेश चंदूरे, शरद केंगारे, स्वप्नील कांबळे, स्वप्नील आटपाडकर, शाहीन शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.