'लाडक्या बहिणी'मुळे महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट ?
मुंबई : खरा पंचनामा
केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू- काश्मीरबरोबरच हरियाणामधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असली तरी महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
यावरुन वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात असतानाच आता राज्यातील निवडणुकीची नवी संभाव्य तारीख समोर आली आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक घेण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले असले तरी राज्यामध्ये विद्यमान विधानसभेची मुदत संपल्यानंतरच म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. तसेच ही निवडणूक लांबणीवर पडण्यामागे शिंदे सरकारच्या 'लाडकी बहीण' योजना कनेक्शनचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये निवडणूक झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही वेळ येऊ शकते.
'लाडकी बहीण' योजना आणि लांबलेल्या निवडणुकीचं थेट कनेक्शन हे मतदार महिलांशी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात मोठा फटका बसल्यानंतर मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु करुन महिलांना दर महिना दीड हजार रुपये देण्याचं निश्चित करण्यात आलं. रक्षाबंधनच्या पूर्वीच या योजनेअंतर्गत दोन हफ्ते लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले. मात्र हरियाणा आणि जम्मू-काश्मीरसोबतच राज्यातील निवडणूक लागली असती तर आचारसंहिता लागू झाली असती आणि त्याचा फटका या योजनेला बसला असता असं सूत्रांचं म्हणणं आहे. विधानसभेला महिला मतदरांना महायुतीकडे आकर्षित करण्यासाठी 'लाडकी बहीण' योजना अधिक अधिक महिलांपर्यंत पोहचवण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. सदर योजनेने किमान 2 ते 3 हफ्ते महिलांच्या खात्यावर जमा झाल्यास महिलांचा विश्वास संपादित करणं अधिक सहज शक्य होईल असा तर्क बांधला जात आहे. आचारसंहिता लागू होऊन हा साऱ्या नियोजनात मिठाचा खडा पडू नये म्हणून निवडणूकच जितकी शक्य तितकी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न आहे.
राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचीही तयारी असल्याचे स्पष्ट संकेत नवी दिल्लीमधील पत्रकार परिषदेत मिळाले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गरज पडली तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल असे संकेत दिले आहेत. कोणत्याही राज्यामधील विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांमध्ये निवडणूक घेण्याची मूभा निवडणूक आयोगाला असते. त्यामुळेच विद्यमान विधानसभा 26 नोव्हेंबरला बरखास्त झाली आणि निवडणूक डिसेंबर होणार असेल तर मधल्या कालावधीमध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी शक्यता आहे. संभाव्य निवडणूक आणि विधानसभा बरखास्तीच्या कालावधीत फार कमी फरक असेल तर अवघ्या काही आठवड्यांमध्ये निवडणुकीचा निकाल लावून पुन्हा सरकार सत्तेत येईल असे संकेतही निवडणूक आयोगाने दिलेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.