Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नवीन फौजदारी कायद्यांविषयी अत्यंत कमी वेळात योग्य माहिती देण्यासाठी या प्रदर्शनीची मदत होईल विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे मत सांगलीत नव्या भारताचे नवीन कायदे प्रदर्शन

नवीन फौजदारी कायद्यांविषयी अत्यंत कमी वेळात योग्य माहिती देण्यासाठी या प्रदर्शनीची मदत होईल 
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे मत
सांगलीत नव्या भारताचे नवीन कायदे प्रदर्शन



सांगली : खरा पंचनामा


अत्यंत सुबोध आणि सोप्या मराठी मध्ये नवीन फौजदारी कायद्यांविषयी मांडलेली ही माहिती जाणून घेण्यासाठी सर्व नागरिकांनी सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये मांडलेल्या या प्रदर्शनीला जरूर भेट द्यावी असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी यांनी आज प्रदर्शनीचे उद्घाटन करताना केले. महिला मुले यांच्याविरुद्धचे गुन्हे तसेच संघटित गुन्हेगारी आदी सर्वांविषयी नवीन कायद्यांमध्ये करण्यात आलेल्या तरतुदींचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. महिला, मुली, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग या सर्वांनी या प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन फुलारी यांनी यावेळी केले. महिला तसेच बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांबाबतच्या नवीन फौजदारी कायद्यांमधील संवेदनशीलतेचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाच्या कटिबद्धतेचा देखील त्यांनी पुनरुच्चार केला.

नवीन फौजदारी कायद्यांविषयी नागरिकांमध्ये जर काही गैरसमज असतील तर ते दूर होण्यासाठी अशा प्रदर्शनीची मदत होईल असे यावेळी बोलताना सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले. नवीन कायद्यांचा भर हा शिक्षेपेक्षा न्यायावर असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि सांगली पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने 29 आणि 30 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे या माहितीपर चित्र प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, नव्या कायद्यात अंतर्भूत केलेली नवीन कलमं आणि त्यांची कार्यपद्धती, ई-एफ आय आर, योग्य वेळेत न्याय, तंत्रज्ञानाचा वापर, न्यायवैद्यक शास्त्राला प्रोत्साहन, साक्षीदारांचे संरक्षण, लहान मुलं आणि महिला सुरक्षा, अभियोजन संचालनालय आदी विषयांवरील माहिती मांडण्यात आली आहे. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद खंडागळे यांनी केले. उपस्थित दर्शकांसाठी नवीन फौजदारी कायद्यावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.

विजेत्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या दोन दिवसीय प्रदर्शनामध्ये नवीन फौजदारी कायद्यांमधील विविध तरतुदी, गैरसमज व वस्तुस्थिती या विषयाची मांडणी करण्यात आली आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य बघता येणार आहे. तसेच क्यूआर कोड स्कॅन करून प्रदर्शनाची संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळवता येणार आहे. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.