Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उत्सवांत लेझर, डीजेला बंदी नाहीच; उच्च न्यायालयाकडून जनहित याचिका निकाली

उत्सवांत लेझर, डीजेला बंदी नाहीच; उच्च न्यायालयाकडून जनहित याचिका निकाली



मुंबई : खरा पंचनामा

सण-उत्सवांत मोठ्या प्रमाणात होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करण्यात सरकारी यंत्रणा सकृतदर्शनी अपयशी ठरल्याचे पुरावे याचिकाकर्ते सादर करू शकलेले नाहीत. त्यामुळे या आदेशांच्या उल्लंघनाप्रकरणी चौकशीची मागणी केली जाऊ शकत नाही, असे नमूद करून सण-उत्सवांतील डीजे, प्रखर दिव्यांचा (लेझर बीम) वापर, त्यांची विक्री, ते भाडेतत्त्वावर देणे या सगळ्यांवर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.

सण आणि उत्सवांत मिरवणुकीसह इतर समारंभासाठी लेझर बीम, कर्णकर्कर्श डीजेचा सर्रास वापर करण्याला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते. तसेच, उत्सवांतील लेझर बीम आणि डीजेच्या वापरामुळे अनेकांची दृष्टी आणि श्रवण क्षमतेवर परिणाम झाला असून काहींना कायमची दृष्टी गमवावी लागली आहे. त्यामुळे, लेझर बीम आणि डिजेच्या वापरावर पूर्ण बंदीची मागणी केली होती.

लेझर बीमच्या नियमनासाठी अद्यापपर्यंत कोणतीही विशिष्ट कायदेशीर तरतूद नाही. त्यामुळे, सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक मेळाव्यांत आणि कार्यक्रमांमध्ये लेझर बीमच्या वापरावरील नियमनासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या मागणीकरिता राज्य सरकारच्या योग्य प्राधिकरणाकडे तपशीलवार निवेदन सादर करण्याची याचिकाकर्त्यांना मुभा आहे, असे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढताना प्रामुख्याने स्पष्ट केले.

मानवी जीवन किंवा इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात येईल, असे अविचारी किंवा निष्काळजी कृत्य करून कोणी दुसऱ्याला गंभीर दुखापत करत असेल, तर त्याबाबत याचिकाकर्ते नव्याने लागू केलेल्या भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ किंवा अन्य कलमानुसार कारवाईची मागणी करू शकतात. त्यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असेही न्यायालयाने उपरोक्त आदेश देताना स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.