महिलांविषयक गुन्ह्यात हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करणार
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा इशारा
सांगली : खरा पंचनामा
महिलांविषयक गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेऊन ते तातडीने नोंदवावेत. अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात हलगर्जीपणा केल्यास किंवा शिथिलता, सौम्यता आढळल्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
श्री. फुलारी म्हणाले, राज्यात घडलेले संवेदनशील गुन्हे, जातीय आणि धार्मिक घडामोडी तसेच आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांविषयक विविध गुन्हे, जातीय व धार्मिक तणावाच्या घडामोडीच्या अनुषंगाने कोणती दक्षता घ्यावी, उपाययोजना कराव्यात याच्या पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. महिला विषयक गुन्ह्यांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवली पाहिजे. तातडीने गुन्हे दाखल करून घेऊन तपास केला पाहिजे. यामध्ये शिथिलता आढळल्यास किंवा हलगर्जीपणा दाखवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. महिलाविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी शाळा, कॉलेजमध्ये जाऊन मुला-मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी दामिनी आणि निर्भया पथकाला सूचना दिल्या आहेत.
महानिरीक्षक फुलारी म्हणाले, आगामी काळातील दहीहंडी, गणेशोत्सव, ईद आणि इतर सण, उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत सूचना दिल्या आहेत. पोलिस दप्तरी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर गावांना भेटी देणे, शांतता समितीच्या बैठका घेणे, गणेश मंडळांच्या बैठका घेणे, मंडळांना प्रोत्साहनपर बक्षीस देणे याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. उपद्रवी लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, सोशल मीडियावर लक्ष ठेवून आक्षेपार्ह पोस्ट, संदेश टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. दंगा काबू योजना, संवेदनशील ठिकाणी रूट मार्च आयोजित करून जातीय व धार्मिक तणाव वाढणार नाही याबाबत दक्ष राहण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
कासेगाव येथील गोळीबार करून खून केल्याचा गुन्हा तत्काळ उघडकीस आणला. हरिपूर परिसरातील घरफोड्यांचा छडा लावला. पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, गावठी कट्टा यासारख्या अग्निशस्त्रांचा बेकायदा वापर करणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष पथक तयार केले जाईल. या पथकांमार्फत अळा शस्त्रांच्या तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांना शोधून कारवाई केली जाईल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.