Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंविरोधात खंडणीचा गुन्हा; आणखी सहा जणांचा समावेश

माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंविरोधात खंडणीचा गुन्हा; आणखी सहा जणांचा समावेश



ठाणे : खरा पंचनामा

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे आणि अन्य सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपांवरून ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सोमवारी मुंबईतील व्यवसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून दाखल संजय पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध करण्यात आला आहे. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनीही असा गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकरणात संजय पांडे यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि गंभीर आरोपांचा समावेश असल्याने हे प्रकरण वादात सापडण्याची शक्यता आहे. तसेच जसजसे हे प्रकरण पुढे जाईल तसतसे यामध्ये आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

माजी आयपीएस अधिकारी संजय पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, ठाण्यातील अधिवक्ता शेखर जगताप, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सरदार पटेल, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल आणि शरद अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मे २०२१ ते ३० जून २०२४ या कालावधीत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींनी आपल्याला त्रास दिला. तसेच आरोपींनी ठाणे नगर पोलिसांमध्ये २०१६ मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा बेकायदेशीर तपास केला. मला आणि इतर व्यावसायिकांना खोट्या केसेसच्या धमक्या दिल्या, पैसे उकळले आणि विशेष सरकारी वकील म्हणून खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारदार पुनामिया यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

भारतीय दंड संहितेच्या १६६ (अ) १७०, १२० ब, १९३, १९५, १९९,२०३, २०५ आणि २०९, ३५२ आणि ३५५, ३८४, ३८९, ४६५, ४६६, ४७१ या कलमांखाली सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्यात २६ ऑगस्ट २०२४ रोजी ईमेलद्वारे पुनामिया यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.