Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कासेगाव खुनातील तीन संशयितांना २४ तासात अटक पत्नीशी अनौतिक संबंधाच्या संशयावरून दिली होती सुपारी : उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांची माहिती

कासेगाव खुनातील तीन संशयितांना २४  तासात अटक
पत्नीशी अनौतिक संबंधाच्या संशयावरून दिली होती सुपारी : उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांची माहिती



सांगली : खरा पंचनामा

कासेगाव-वाटेगाव रस्त्यावर शुक्रवारी सकाळी पांडुरंग भगवान शिद (वय ४३, रा. कासेगाव) याचा डोक्यात बंदूकीने गोळ्या झाडून खून केला होता. या घटनेनंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गोपनीय माहिती मिळाल्यानंतर हा खून पत्नीशी अनौतिक संबंध असल्याच्या संशयावरून सुपारी देऊन खून झाल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी तिघांना २४ तासाच्या आत अटक करण्यात आल्याची माहिती इस्लामपूरचे पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली.


विशाल जयवंत भोसले (वय २५, रा. कामेरी), शिवाजी भिमराव भुसावळे (वय ३७, रा. इस्लामपूर, मूळ रा. उमरगा), सुरेश नारायण ताटे (वय ४५, रा. उरूण इस्लामपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील ताटे याला आपल्या पत्नीशी मृत पांडुरंग शिद याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे शिद याचा काटा काढण्यासाठी ताटे याने भोसले आणि भुसावळे यांना सुपारी दिली होती. तसेच खून करण्यासाठी हत्यारही पुरवले होते. शिद याचा खून केल्यानंतर सहा लाख रूपये देण्याचेही ठरले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी शिद कासेगाव-वाटेगाव रस्त्यावरून जात असताना त्याच्या कपाळावर, डोक्यात बंदूकीने गोळ्यात झाडल्या. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयित निघून गेले.

या घटनेनंतर वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महानिरीक्षक फुलारी यांनीही तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपअधीक्षक चव्हाण यांनी हल्लेखोरांना शोधण्यासाठी विविध पथके तयार केली होती. तसेच या खुनाचे कारण आर्थिक व्यवहार, सावकारी तसेच अनैतिक संबंध आहे का याचाही तपास पोलिस करत होते. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाच्या जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज, तांत्रिक माहितीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू ठेवला होता. त्यावेळी उपअधीक्षक चव्हाण यांना हा खून अनैतिक संबंधातून ताटे यानेच सुपारी देऊन घडवून आणल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर तीनही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. नंतर त्यांना अटक करण्यात आली.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, उपअधीक्षक मंगेश चव्हाण, एलसीबीचे निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, नितीन सावंत, विक्रम पाटील, पंकज पवार, रूपाली बोबडे, उपनिरीक्षक जयनाथ चव्हाण, बाजीराव पाटील, सुरेश पाटील, आनंदा चव्हाण तसेच कासेगाव, इस्लामपूर पोलिस ठाण्यांकडील अंमलदार, एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.