सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवणे आवश्यक
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकारी बैठकीत सूचना
सांगली : खरा पंचनामा
यावर्षी गणेशोत्सवात पोलिस व जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणाऱ्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. उत्सवाच्या काळात या कॅमेऱ्यांचा उपयोग होईल. त्यानंतर परिसरातच हे कॅमेरे कार्यरत ठेवल्यास पोलिसांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल अशा सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिल्या.
महानिरीक्षक फुलारी यांनी सांगलीच्या दौऱ्यावर असताना काही गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यानंतर ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका, त्यानंतरची राज्यातील राजकीय व सामाजिक स्थिती, बंद, आंदोलने यामुळे पोलिसांवर ताण जाणवत आहे. अशातच आता आगामी गणेशोत्सवासह सर्व सण शांततेत व मंगलमय वातावरणात पार पडावेत यासाठी पोलिस सतर्क आहे. गणेश मंडळांनी त्यांना मिळणाऱ्या वर्गणीचा सदुपयोग करावा. वेळेच्या मर्यादेचे पालन करावे. ध्वनीक्षेपकाबद्दल असलेल्या सूचना, रस्त्यावर किती टक्केपर्यंत मंडप उभारावा याबाबत दिलेल्या सुचनांचे पालन करावे. शासनाच्या स्पर्धेत सहभागी व्हावे. सर्व प्रकारचे प्रदुषण टाळावे. पर्यावरणपूरक उत्सव करावा.
ते म्हणाले, ध्वनी प्रदुषण तसेच प्रकाश प्रदुषण याबाबत पोलिस दलाकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रदुषण करणाऱ्या उत्पादनावर बंधन नाही, परंतू त्याचा वापर करून कायदेशीर तरतुदींचे भंग केल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागते. आगामी गणेशोत्सव शांततेत पार पाडला जावा यासाठी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. यंदाच्या उत्सवात प्रत्येक मंडळाने लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. उत्सव काळात आणि त्यानंतरही त्याचा सर्वांना उपयोग होईल.
यावेळी अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोकर, मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, इस्लामपूरचे उपअधीक्षक मंगेश चव्हाण तसेच एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सुधीर भालेराव आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.