मिरजेत कर्नाटकातील वृद्धाच्या खूनप्रकरणी एकाला अटक
स्टॅंडवर बसण्यावरून केले कृत्य, महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
मिरज : खरा पंचनामा
मिरज शहरातील ग्रामीण बसस्थानकावर बाकड्यावर बसण्याच्या कारणावरून एकाने कर्नाटकातील वृद्धाला भोसकले होते. दि. २ आगस्ट रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजद्वारे कसोशीने तपास करत एकाला अटक करण्यात आली. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली.
संभाजी चंदर नाईक (वय ४०, रा. जानराववाडी, ता. मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. नारायण लक्ष्मण बडोदे (वय ५९, रा. हुब्बरहट्टी, ता. रायबाग, जि. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. दि. २ आगस्ट रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एक व्यक्ती मिरज ग्रामीण बस स्टॅंडवर बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन १०८ रूग्णवाहिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली. त्यावेळी ती व्यक्ती मृत झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचे नाव नारायण बडोदे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात हलवण्यात आला.
उत्तरीय तपासणीत मृतदेहाच्या पोटावर वार असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी यातील संशयिताला पकडण्याच्या सूचना महात्मा गांधी चौक पोलिसांना दिल्या. त्यानुसार पथकाने दि. २ आगस्ट रोजीचे तसेच अन्य दिवसांचे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अनेकदा तपासले. त्यात मृत बडोदे याच्याशी एकजण झटापट करत असल्याचे दिसून आले. त्यातील संशयिताची चौकशी केल्यानंतर तो बिगारी कामगार असून शहरात विविध ठिकाणी थांबत असल्याची माहिती मिळाली. त्याचा शोध घेतल्यानंतर तो स्टॅंडच्या मागील अंधारात लपून बसल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने पाऊस आल्यानंतर स्टॅंडवरील बाकड्यावर बसण्यावरून वाद झाल्यानंतर बडोदे याचा चाकून भोसकून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. बडोदे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मिरज शहर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल आहेत.
मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, महात्मा गांधी चौकचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक बिरप्पा लातुरे, उपनिरीक्षक संदीप गुरव, विनोद शिंदे, धनंजय चव्हाण, सचिन कुंभार, जावेद शेख, विनोद चव्हाण, विक्रम खोत, बसवराज कुंदगोळ, अभिजित धनगर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.