Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विनेश फोगट प्रकरणाचे संसदेत पडसाद; विरोधकांचा लोकसभेत जोरदार गदारोळ

विनेश फोगट प्रकरणाचे संसदेत पडसाद; विरोधकांचा लोकसभेत जोरदार गदारोळ



नवी दिल्ली : खरा पंचनामा

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी कुस्तीपटू विनेश फोगटला मोठा झटका बसला आहे. वजन जास्त असल्याने तिला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले आहे.

यानंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांना सरकारची कोंडी करण्याची संधी मिळाली असून या पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. संसदेच्या अधिवेशनातही विरोधकांनी याच मुद्द्यावर जोरदार गदारोळ केला. मंगळवारी (दि.6) तिने उपांत्य फेरीत क्युबाच्या लोपेझ गुझमनचा 5-0 असा पराभव केला होता. महिला कुस्तीत ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती.

अंतिम सामन्यापूर्वी करण्यात आलेल्या चाचणीत विनेशचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता 50 किलो वजनाच्या अंतिम सामन्यात विनेश फोगट खेळू शकणार नाही. अंतिम सामन्यापूर्वी विनेशवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे करोडो भारतीयांच्या पदक मिळवण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे.

या प्रकारानंतर भारतातील राजकारण तापलं असून हा भारताचा अपमान आहे. ऑलिम्पिक स्पर्धांवर बहिष्कार घालावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी केली. एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की विनेश अपात्र ठरल्यानंतर भारताकडे अन्य काही पर्याय आहेत का याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्याशी चर्चा केली. विनेश फोगटला मदत मिळत असेल तर या निर्णयाविरोधात तिने प्रखर विरोध नोंदवावा अशा सूचनाही पीएम मोदींनी दिल्याचे समजते.

विनेश फोगटची आतापर्यंतची कामगिरी प्रभावी राहिली आहे. या बातमीने मी खूप निराश झालोय. तिच्या प्रयत्नांना पुरस्कार मिळाला नाही ज्यावर तिचा हक्क होता अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी दिली. समाजवादी पार्टीचे खासदार अखिलेश यादव म्हणाले, यामागील तांत्रिक कारणांचा तपास झाला पाहिजे. या तपासातून सत्य काय आहे ते समोर आलं पाहिजे.

दरम्यान, या मुद्द्यावर लोकसभेत काही काळ गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हा मुद्दा लोकसभेकत उपस्थित केला. सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले की दुपारी 3 वाजता केंद्रीय क्रीडा मंत्री यावर उत्तर देणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.