एक्साईजच्या भरारी पथकाच्या कारवाईची हॅट्रिक!
सांगलीत कारसह १७.२० लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त, कणकवलीच्या एकाला अटक
सांगली : खरा पंचनामा
एका मारूती कारमधून गोवा बनावटीची दारू घेऊन आलेल्या कणकवलीतील एकाला पहाटे अटक करण्यात आली. सांगलीतील विजयनगर चौकात ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून कार, गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स, मोबाईल असा १७.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली. ही कारवाई करून राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने कारवाईची हॅट्रिक केली आहे.
वैभव मनोज कांबळी (वय २२, रा. लक्ष्मीवाडी, कुडाळ, मूळ रा. कणकवली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच विजयनगर चौक परिसरात भरारी पथकाने गोवा बनावटीची दारू जप्त केली होती. त्यानंतर सोलापूर एक्सप्रेस वेवरही गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली होती. सातत्याने या कारवाया होत असतानाही तस्कर मोकाटच होते. त्यामुळे भरारी पथकाने त्यांच्यावर वॉच ठेवला होता.
मंगळवारी पहाटे सांगलीतील विजयनगर चौकात पथकाने सापळा रचला होता. त्यावेळी एक मारूती कार (एमएच ०७ एएस ०२१६) तेथे आली. त्या कारचा संशय आल्याने पथकाने ती कार अडवून तिची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूने भरलेले बॉक्स सापडले. त्यानंतर कार चालक वैभव कांबळी याला अटक करून कार आणि दारू जप्त करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाने भरारी पथकाचे निरीक्षक राजकुमार खंडागळे, दुय्यम निरीक्षक विनायक जगताप, अजितकुमार नायकुडे, युवराज कांबळे, सुवास पोळ, स्वप्नील कांबळे, वसंत घुगरे, वैभव पवार, शाहीन शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.