Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली, मिरजेतून दुचाकी चोरणाऱ्या कर्नाटकातील तरूणाला अटक पाच लाखांच्या ९ दुचाकी जप्त ः पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची माहिती

सांगली, मिरजेतून दुचाकी चोरणाऱ्या कर्नाटकातील तरूणाला अटक
पाच लाखांच्या ९ दुचाकी जप्त ः पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची माहिती



सांगली : खरा पंचनामा

सांगलीसह मिरज शहरातून दुचाकी चोरणाऱ्या कर्नाटकातील तरूणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ५ गुन्हे उघडकीस आणत पाच लाख रूपये किमतीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

रणजित श्रीधर लोखंडे (वय २५, रा. मंगसूळी, ता. अथणी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. दि. १८ आॅगस्ट रोजी सांगलीतील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून अकिब बेग यांची दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरातील वाढत्या दुचाकी चोऱ्यांमुळे अधीक्षक घुगे यांनी शहर पोलिसांना या चोरट्यांना शोधून अटक करण्याच्या सूचना शहरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांना दिल्या होत्या. निरीक्षक मोरे यांनी चोरट्यांना पकडण्यासाठी एक खास पथक तयार केले होते.  

पथकातील संतोष गळवे यांना एक तरूण कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी परिसरात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाने या परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित तेथे आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील दुचाकीबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने ती दुचाकी बसस्थानक परिसरातून चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने सांगली आणि मिरज शहरातून आणखी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून सांगली शहर पोलिस ठाण्याकडील ३, मिरज शहर आणि महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.

शहर पोलिसांच्या कारवाईचे अधीक्षक घुगे यांनी कौतुक केले. सांगली शहरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, सचिन शिंदे, विनायक शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, मछिन्द्र बर्डे, संदीप कुंभार, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.