Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवारांचा नवा डाव कोल्हापुरात महायुतीला धोबीपछाड देणारा?

शरद पवारांचा नवा डाव कोल्हापुरात महायुतीला धोबीपछाड देणारा?



कोल्हापूर : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना बारामतीत अडकवून ठेवण्यासाठी भाजप आणि महायुतीने आखलेले डावपेच आठवतात का? त्यावर मात करत शरद पवार यांनी महायुतीला धोबीपछाड दिली होती. बारामतीत अडकून राहणे तर दूरच, जवळच्या माढा आणि सोलापूरसह राज्यभरात फिरून त्यांनी महायुतीला जेरीस आणले होते.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अगदी काहीच दिवसांनंतर बाहेर पडलेल्या पवारांनी विधानसभा निवडणुकीतही महायुतीला घेरण्यासाठी डावपेच आखायला सुरुवात केली आहे. सनदी लेखापाल (सीए) असलेले भाजप नेते समरजित घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणिते जुळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे कागलचे (जि. कोल्हापूर) आमदार, मंत्री हसन मुश्रीफ यांना जोरदार झटका दिला आहे. घाटगे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांचा हा पहिला डाव. मुश्रीफ हे महायुतीत आल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांना विरोधाची भूमिका घाटगे यांनी घेतली होती, मात्र असे काही होऊ शकेल, याची कल्पना महायुतीने केलेली नसेल. घाटगे यांनी घाईत पाऊल उचलू नये, असे सांगत असताना भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून जाणारे होते.

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी महायुतीला एक नव्हे, असे तीन धक्के बसले. बदलापूर अत्याचार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यासाठी, संस्थाचालकांवर कारवाई करण्यासाठी दिरंगाई केल्यामुळे महायुती सरकार आधीच बॅकफूटवर गेले आहे. भाजपचे कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिला आहे.

राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून देसाई यांना निवडणूक लढवायची आहे. मात्र प्रकाश आबिटकर हे शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, याची जाणीव झाल्याने देसाई यांनी राजीनामा दिला. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

हसन मुश्रीफ हे महाविकास आघाडीमध्येही मंत्री होते. त्यावेळी त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला होता. समरजित घाटगे यांनी ईडीला आपल्याविरोधात खोटी कागदपत्रे दिली, असा आरोप त्यावेळी मुश्रीफ यांनी केला होता. घाटगे यांनी कागल मतदारसंघातून लढण्याची तयारी सुरू केली होती. दरम्यानच्या काळात अजितदादा पवार हेही महायुतीत सहभागी झाले. अजितदादांसोबत मुश्रीफ हेही महायुतीत आले. त्यामुळे घाटगे यांची अडचण झाली.

मुश्रीफ महायुतीत आल्यानंतरही घाटगे यांनी त्यांच्यावर हल्ले सुरूच ठेवले होते. मात्र भाजप सोडण्याचे संकेत त्यांनी दिले नव्हते. आता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने मुश्रीफ यांच्यासह महायुतीच्या पोटात गोळा आला आहे. शरद पवार हे सप्टेंबरच्या सुरुवातीला कोल्हापूर दौऱ्यावर जाणार असून, त्यावेळी घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती आहे.

घाटगे यांचे मन वळवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. मला जनतेतून आमदार व्हायचे आणि त्यासाठी मी एका पक्षात प्रवेश करणार आहे. भाजपची अडचण मी समजू शकतो, मला त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही, असे त्यांनी या शिष्टमंडळाला सांगितले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.