दुचाकी चोरणाऱ्या कर्नाटकातील चोरट्याला अटक
एक लाखाचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातून दुचाकी चोरणाऱ्या एका तरूणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
प्रदीप कल्लाप्पा हळींगळी (वय ३२, रा. शिरहट्टी, ता. अथणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दुचाकी चोरट्यांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचे एक विशेष पथक तयार केले होते. हे पथक जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी पथकाला एक तरूण विश्रामबाग येथील लोकल बोर्ड कॉलनीत चोरीच्या दुचाकीची विक्री करण्यासाठी आल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
पथकाने तेथे जाऊन शोध घेतल्यानंतर एक तरूण विना क्रमांकाची दुचाकी घेऊन थांबल्याचे दिसून आले. संशयावरून पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दुचाकीबाबत कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने कुपवाड येथील एका हॉटेलसमोरून ही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच चिंचणी येथील यात्रेवेळी तेथूनही एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याला कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक संदीप शिंदे, इम्रान मुल्ला, आमसिद्ध खोत, अमोल ऐदाळे, सोमनाथ गुंडे, सुनील जाधव, सोमनाथ पतंगे, रोहन गस्ते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.