Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिला पत्रकार विनयभंग प्रकरण; वामन म्हात्रे यांच्यावरील 'एफआयआर' गायब

महिला पत्रकार विनयभंग प्रकरण; वामन म्हात्रे यांच्यावरील 'एफआयआर' गायब



ठाणे : खरा पंचनामा

महिला पत्रकाराचा अर्वाच्य भाषा वापरून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावरील 'एफआयआर' गायब असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या सीसीटीएनएस संकेतस्थळावरून 'एफआयआर' गायब झाला आहे. त्यामुळे हे कसले 'संकेत' आहेत, यामागे नक्की काय गौडबंगाल आहे, याबाबत सोशल मीडिया आणि शहरात सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

बदलापूर येथील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी २० ऑगस्टला नागरिकांनी उत्स्फूर्त आंदोलन केले होते. या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या 'सकाळ'च्या स्थानिक महिला पत्रकाराला वामन म्हात्रे यांनी, 'तू अशा बातम्या करतेस, जणू काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे' असे शब्द वापरले

यावर महिला पत्रकार लागलीच बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यास गेल्या; मात्र आंदोलनाची कामे आणि इतर राजकीय दबावाखाली पोलिसांनी त्या दिवशी तक्रार घेतली नाही.

२१ ऑगस्टला संपूर्ण शहरातून आणि विविध राजकीय पक्षांकडून आवाज उठवला गेल्यानंतर सायंकाळी सहा वाजता अॅट्रोसिटीअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान हा गुन्हा दाखल होऊ नये आणि समेट घडावा, यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आला; पण महिला पत्रकाराने मोठ्या हिमतीने हा लढा सुरू ठेवला आहे.

आता या गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे विभाग करीत आहे. दरम्यान, जामीन मिळवण्यासाठी वामन म्हात्रे यांनी न्यायालयात धाव घेतली असून सोमवारी (ता. २६) सुनावणी होणार आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर महिला पत्रकाराला आणि तिच्या परिवाराला मानसिक त्रास देण्याचे काम सुरूच आहे. विविध प्रलोभने दाखवूनही तक्रार मागे घेतली जात नसल्याने आता वेगळ्या मार्गाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचा प्रकार समोर आला आहे.

राज्यात कोणत्याही पोलिस ठाण्यात कोणत्याही कलमांतर्गत गुन्हा नोंद झाल्यास त्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या सीसीटीएनएस या वेबसाइटवर नमूद केली जाते.

कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात न जाता एका क्लिकवर त्याला ही माहिती सहज उपलब्ध व्हावी, हे यामागील उद्दिष्ट होते. या संकेतस्थळावर २१ ऑगस्टला बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची यादी असताना '०३८६' क्रमांकाचा एफआयआरची माहिती गायब झाली आहे.

यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याचे बोलले जात आहे. इतर सगळ्या क्रमांकाच्या एफआयआर या यादीवर उपलब्ध आहेत, मात्र वामन म्हात्रे यांच्यावरील गुन्ह्याचाच एफआयआर का दिसत नाही, या प्रश्नावर सध्या सोशल मीडिया आणि शहरात चर्चा सुरू आहे.

नियमाप्रमाणे राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या एफआयआरची नोंद महाराष्ट्र सरकारच्या सिटीझन वेबसाइटवर होते. महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआर सेक्शनमध्ये ती प्रसिद्ध केली जाते. गुन्हा घडला, त्या दिवसाची तारीख, पोलिस ठाणे, एफआयआर क्रमांक इत्यादी माहिती दिल्यानंतर एका क्लिकवर त्या एफआयआरसह त्या दिवशी घडलेल्या इतर गुन्ह्यांची माहिती तेथे उपलब्ध होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.