खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याने पोलिस कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्याचे आदेश
पुणे : खरा पंचनामा
वडीलोपार्जित जमीनीच्या वादातुन झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर संबंधित पुणे पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया यांनी दिले आहेत.
विक्रम गणपत फडतरे असे बडतर्फ केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. फडतरे हा पुणे पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहे. फडतरे हा बारामती तालुक्यातील सांगवी येथील आहे. गावातील वडीलोपार्जित जमीनीवरून त्याचे भावकीसमवेद वाद होते.
संबंधित वादातुन १२ एप्रिल २०२३ रोजी विक्रम याचा भाऊ विशाल फडतरे याने त्यांचा नातेवाईक विनोद हिराचंद फडतरे याचा खून केला होता. या गुन्ह्यात पोलिस कर्मचारी विक्रम फडतरेचा भाऊ विशाल हा मुख्य आरोपी आहे. तर त्याच्यासह पोलीस कर्मचारी विक्रम फडतरे व त्याचे वडील गणपत फडतरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी विक्रम फडतरेला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो येरवडा कारागृहात आहे.
पुणे पोलिसांनी पोलिस कर्मचारी फडतरेची विभागीय चौकशी केली. त्याने वडील व भावासोबत विनोद फडतरे याच्या खुनाचा कट रचला.
फडतरेचे कृत्य पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारे आहे, तसेच पोलिस दलाच्या शिस्तीला बाधा आणणारे आहे, असे नमूद करून अतिरिक्त पोलिस आयुक्त चावरिया यांनी फडतरेला पोलिस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश दिले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.