अनिल देशमुख पुन्हा अडकणार? सीबीआयने दाखल केला गुन्हा
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले.
कथित १०० कोटी वसुली प्रकरणी चौकशीचा ससेमिरा सुरू असतानाच आता अनिल देशमुखांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने देशमुखांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर देशमुखांनी एक पोस्ट शेअर केली. "धन्यवाद... देवेंद्रजी फडणवीस, माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता, न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे", अशा शब्दात त्यांनी फडणवीसांना इशारा दिला.
"महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे, ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे. आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे", असेही देशमुख म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल देशमुख गृहमंत्री होते. त्याच काळात जळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.