घरातल्या खूप जवळच्या माणसाने टीप दिल्यामुळे सापडला जयदीप आपटे
कल्याण : खरा पंचनामा
मागच्या आठवड्यात मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. हा पुतळा उभारल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे.
या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. या प्रकरणात जयदीप आपटे आणि चेतन पाटील दोघे मुख्य आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात मालवण पोलीस ठाण्यात एफआयआरची नोंद आहे. जयदीप आपटे शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार होता. चेतन पाटीलकडे चबुतऱ्याची जबाबदारी होती. चेतन पाटीलला काही दिवसांपूर्वी अटक झाली. पण जयदीप आपटे सापडत नव्हता. जितेंद्र आव्हाड यांनी डॉन चित्रपटातील डायलॉग मारुन जयदीप आपटेको पकडना नामुमकिन हैं असं म्हटलं होतं. मागच्या अनेक दिवसांपासून फरार असलेला हाच जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागला आहे.
जयदीप आपटे अंधाराचा फायदा घेत पत्नी आणि आईला भेटण्यासाठी त्याच्या कल्याणच्या राहत्या घरी आला होता. त्याचवेळी पोलिसांनी जयदीप आपटे याला ताब्यात घेतलं. जयदीप आपटे याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लुकआऊट जारी केली होती. 39 वर्षाचा जयदीप आपटे जेजे स्कूल ऑफ आर्टचा माजी विद्यार्थी आहे. पोलिसांसमोर त्याने शरणागती पत्करावी यासाठी कुटुंब आणि मित्र परिवाराकडून त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरु होता. कल्याण आणि ठाणे पोलीस जयदीप आपटेच्या मागावर होते. घराजवळच त्याची कार्यशाळा होती. कुटुंबाला भेटण्यासाठी आलेल्या जयदीप आपटेला बुधवारी अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप आपटेने पत्नीशी संपर्क साधला. मी घरी येतोय असं तिला सांगितलं. तिने पोलिसांना याबद्दल कळवलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. जयदीपच्या कुटुंबियांना त्याची चिंता होती. त्याने घरी येऊन पोलिसांना चौकशीत सहकार्य करावं, अशी त्यांची भूमिका होती. जयदीप आपटेला थोड्याच वेळात मालवण पोलीस स्थानकात आणल जाईल. जर वेळेत आले तर बाकीच्या प्रोसिजर करून त्याला आज मालवण न्यायालयात हजर केलं जाईल. मुंबई वरून येण्यास वेळ झाला तर कदाचित त्याला उद्या हजर केलं जाऊ शकतं. या प्रकरणातील दुसरा आरोपी चेतन पाटील याची आज पोलीस कोठडी संपणार असून दुपार नंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाईल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.