हनीट्रॅपचा कारनामा भोवला; पीएसआय उभे बडतर्फ
पुणे : खरा पंचनामा
श्रेणी पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) काशिनाथ मारुती उभे यांना पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी (दि. 24) याबाबतचे आदेश दिले आहेत. उभे यांना कायद्याचे पुरेसे आणि सखोल ज्ञान असताना समाजविघातक, संशयास्पद, बेशिस्त, बेजाबदार तसेच पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारे वर्तन केल्याचा ठपका ठेवत बडतर्फ करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात नेमणुकीस असताना उभे यांनी हनीट्रॅप टोळीतील तिघा महिलांसोबत मिळून कोथरूडमधील एका ज्येष्ठ नागरिकाला लॉजवर हाताने मारहाण केली. त्यानंतर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच संबंधित व्यक्तीकडे पाच लाखांची मागणी करून 20 हजार रुपये, मोबाईल काढून घेतला होता. याप्रकरणी उभे आणि तीन आरोपी महिलांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात 30 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर उभे यांना खात्यातून निलंबित करण्यात आले होते. हा प्रकार 29 जुलै रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास अलका टाकीज चौकातील तुषार लॉजवर घडला होता.
याबाबत बोलताना पोलिस सांगतात की, फिर्यादी ज्येष्ठ नागरिक एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले होते. आरोपीपैकी एका महिलेने त्यांच्याशी ओळख करून घेतल्यानंतर आजारी असल्याचे सांगत उपचारांसाठी दोनदा पैसे घेतले. यानंतर हॉटेलमध्ये जेवण करताना त्यांना सोमवारी दुपारी अलका टॉकीज चौकातील एका लॉजवर बोलावून घेतले. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर रूममध्ये दोन महिला आणि एक पुरुष घुसले. त्यांनी महिला हक्क संरक्षण समितीच्या सदस्या, तर पुरुषाने पोलिस असल्याचे सांगत चापट मारण्यास सुरुवात केली. तसेच अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तेव्हा सोबत असलेल्या महिलेने देखील कांगावा केला. यानंतर ज्येष्ठाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. तडजोडीअंती तीन लाख द्यायचे ठरले. यानंतर ज्येष्ठाच्या खिशातील 20 हजार काढून घेतले. तसेच एटीएममधील 60 हजार काढण्यासाठी त्यांना कारमध्ये कोंबून कर्वे पुतळ्याजवळ नेले. तेथे एका सराफी दुकानात अंगठी विकायला लावली. मात्र, दुकानदाराने बदल्यात सोने घ्यावे लागेल, असे सांगितल्याने तो डाव फसला. यानंतर ज्येष्ठाला एटीएम सेंटरमध्ये पाठविले. परंतु, त्याने चुकीचा पिन टाकल्याने पैसे निघाले नाहीत. यामुळे त्यांना मारहाण करीत घरातून चेक आणून देण्यास सांगितले तसेच मोबाईल फोनही काढून घेतला. ही संधी साधत ज्येष्ठाने पुढील चौकातून रिक्षा पकडत पळ काढला. त्याने कुटुंबीयांना हकीगत सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा प्रकार घडल्यानंतर विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक मनोज बरुरे तपास करीत होते. ज्या लॉजवर हा प्रकार घडला तेथील रजिस्टर आणि सीसीटीव्ही फुटेज बरुरे यांनी तपासले. त्या वेळी एका आरोपी महिलेच्या आधार कार्डची माहिती हाती लागली. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुन्ह्यात वापरलेली गाडी दिसून आली. कोथरूड परिसरातून महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्या दोन साथीदार महिला मिळून आल्या. तर, दुसरीकडे गाडीची माहिती घेतली तेव्हा ती मुळशी तालुक्यात एका व्यक्तीच्या नावावर असल्याचे दिसून आले. त्याची चौकशी केली तेव्हा ती गाडी पोलिस उपनिरीक्षक उभे वापरत असल्याचे समजले. आरोपी महिला देखील याबाबत काही बोलत नव्हत्या. मात्र, बरुरे यांनी कौशल्यपूर्वक तपास करीत महिलांना बोलते केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.