पोलिस दलात नव्याने 111 उपनिरीक्षक दाखल
नाशिक : खरा पंचनामा
सन २०१६ मध्ये खातेअंतर्गत सरळ सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १२५ व्या तुकडीतील १११ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक मंगळवारी (दि. २९) पोलिस दलात सहभागी झाले. महाराष्ट्र पोलिस अकादमीत झालेल्या दीक्षांत संचलन सोहळ्याप्रसंगी राज्य दहशतवादविरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक नवल बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अकादमीचे संचालक राजेश कुमार, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ए. डी. जी. बजाज यांनी मार्गदर्शन केले. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन कामात प्रशिक्षणाची सांगड घालत समाजातील गरजू घटकांना संकटात आवश्यक ती कायदेशीर मदत करावी. ती करताना संवेदनशीलता महत्त्वाची आहे. आपले वर्तन पक्षपाती नसावे. व्यवहार सौहार्दपूर्ण असावेत. कम्युनिटी पोलिसिंग ही महत्त्वाची बाब आहे. गुन्ह्याचे सबळ पुरावे शोधून पीडितांना न्याय मिळवून द्यावा. आधुनिकतेची कास धरून तरबेज व्हावे. सेवा निष्कलंक ठेवावी. धर्म, जात ही केवळ 'खाकी' आहे, असे ते म्हणाले.
१२५ व्या तुकडीचे प्रशिक्षण २९ जानेवारी ते २८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत झाले. या तुकडीतील अनेक अधिकाऱ्यांनी कर्मचारी असताना पोलिस महासंचालक पदक पटकावले आहे. ९८ अधिकारी पदवीधर, तर तिघे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असून, तुकडीचे सरासरी वय ३६ ते ४० वयोगटात होते. सर्वाधिक ४१ अधिकारी पश्चिम महाराष्ट्रातील असून, मराठवाड्यातील १४, २९ कोकणातील, २० विदर्भ आणि सात उत्तर महाराष्ट्रातील आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.