वड्डीच्या तबऱ्या शिंदेसह ७ जणांच्या टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची मंजुरी
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील वड्डी येथील तरबेज उर्फ तबऱ्या चारशिट्या शिंदेसह त्याच्या टोळीतील सातजणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर मोकाअंतर्गत कारवाईसाठी सांगली पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली आहे.
तरबेज उर्फ तबऱ्या चारशिट्या शिंदे, रणजित अशोक भोसले (दोघेही रा. वड्डी), सुरेश रवि भोसले (रा. टाकळी बोलवाड), पल्ली भोसले (रा. पाटगाव), अक्षय शहाजी काळे (रा. मालगाव), कुशल आनंदराज काळे (रा. एरंडोली), सिराज उर्फ किरण शिसफुल भोसले (रा. टाकळी बोलवाड) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दि. २४ मे रोजी मध्यरात्री मिरज-सोलापूर एक्सप्रेस वेवर कळंबी येथे एका पेट्रोल पंपावर वाहनात झोपलेल्यांना चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. या सात संशयितांनी दाम्पत्याला मारहाण करत दागिने लुटले होते. त्यानंतरही या टोळीने गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या.
गेल्या दहा वर्षात या टोळीने दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमविणे, गृह अतिक्रमण, चोरीच्या वस्तू विकत घेणे असे १७ गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया वाढल्या होत्या. त्यामुळे मिरज ग्रामीण पोलिसांनी या टोळीवर मोकाअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे सादर केला होता. त्याचे अवलोकन करून त्यांनी तो प्रस्ताव मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याकडे पाठवला होता. शनिवारी महानिरीक्षक फुलारी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
या कारवाईत एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे, दीपक गट्टे, शशिकांत जाधव, हेमंत ओमासे, सचिन मोरे, विकास भोसले, सुनील देशमुख आदींनी भाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.