सरकारी नोकरीचे आमिष दाखवून चौघांची फसवणूक
कोल्हापूरातील एका विरोधात गुन्हा
मुंबई : खरा पंचनामा
सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील चौघांची सुमारे १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूरमधील रहिवासी प्रसाद बापूसाहेब कांबळे याच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी चौघांनी तक्रार केली असून आरोपीने अशा पद्धतीने इतर व्यक्तींचीही फसवणूक केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तक्रारदार दीपक जालिंदर कांबळे कुटुंबियांसोबत ताडदेव परिसरात वास्तव्यास आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांची प्रसाद कांबळे बरोबर ओळख झाली होती. प्रसाद कोल्हापूरचा रहिवीसी आहे. आपली मंत्रालयात चांगली ओळख आहे, असे त्याने तक्रारदाराला सांगितले. सरकारी नोकरीसाठी कोणी इच्छुक असेल तर त्यांना नोकरी मिळवून देतो, असेही त्याने दीपक यांना सांगितले. त्यामुळे दीपक कांबळेंसह त्यांचे परिचित संदीप कर्नेकर, प्रकाश जुवेकर आणि विनायक पालेकर यांनी शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती प्रसादला केली होती. त्यासाठी त्यांची फोर्ट येथील मिंट रोडवरील आनंद भुवन हॉटेलमध्ये एक बैठक झाली. या भेटीमध्ये प्रसादने चौघांनाही सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या नोकरीसाठी त्याने त्यांच्याकडून १३ लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत सरकारी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे या चौघांनी नोकरीसाठी दिलेले १३ लाख रुपये परत देण्याची विनंती त्याला केली. मात्र त्याने रक्कमही परत केली नाही. अशा प्रकारे त्याने सरकारी नोकरीसाठी रक्कम घेऊन फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रक्कम न मिळाल्यामुळे चौघांनीही माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांकडे प्रसाद कांबळेविरोधात तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यांनतर पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम ४०६ (फौजदारी विश्वासघात) व ४२० (फसवणूक) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. एकूण १३ लाख सात हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.