भाजपचा महाराष्ट्रातही 'हरियाना पॅटर्न'!
मराठेतरांच्या मेळाव्यांचा आधार
मुंबई : खरा पंचनामा
हरियानातील अत्यंत कठीण विधानसभा निवडणूक जिंकताना भाजपने जागांची नाराजी लक्षात घेत अन्य जातींना एकत्र आणून 'सोशल इंजिनिअरिंग'चा प्रयोग यशस्वी करून दाखविला. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मराठेतर समाजांचे मेळावे घेत भाजप मतांची बेगमी करत आहे. पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी आजवर १६८ छोट्या-मोठ्या जातींचे मेळावे घेतले आहेत.
मराठा समाजाला समवेत आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच या मराठेतर जातींना भाजपने जोडून घेतले आहे. महायुतीला हरियानाने दिलासा दिला असतानाच काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने मविआच्या जागावाटपात ठाकरे गट जास्त जागा मागेल, असे संकेत आहेत.
हरियानाच्या निकषावर आणि तशाच समीकरणांचा आधार घेत महाराष्ट्रातील निवडणूक जिंकण्याचे नियोजन भाजपने केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विश्वासू सहकारी विजय चौधरी हे या मेळाव्यांचे आयोजन करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हरियानाप्रमाणे मोहीम राबवली जात असून तेथे मिळालेले यश हे महाराष्ट्रातील नेते आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देईल, असा विश्वास भाजपत व्यक्त होत आहे. मोठा समाज भाजपच्या विरोधात गेल्यानंतर अन्य समाजांची मोट बांधून मतांना एकत्र आणण्याचे केलेले प्रयत्न हा हरियानातील भाजपच्या विजयाचा महत्त्वाचा भाग मानला जातो.
महाराष्ट्रात अत्यंत प्रबळ मराठा समाज भाजपवर नाराज आहे. भाजपने 'प्लॅन बी' म्हणून ओबीसी समाजाचे छोटे मिळावे सातत्याने आयोजित करणे सुरू ठेवले आहे. या आधारावरच नवे सामाजिक समीकरण प्रत्यक्षात येण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. भूपेंद्र यादव यांनी गेले काही दिवस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यात मांडव घालून छोट्या जातींशी संवाद साधण्याचा उपक्रम चालू ठेवला आहे. हरियानात भाजपला मदत करण्यासाठी संघ परिवाराने पडद्यामागून नेहमीपेक्षा अधिकच सक्रियरीत्या मदत केली, असे बोलले जाते.
या वेळी महाराष्ट्रातील संघ परिवाराचे कार्यकर्ते अत्यंत हिरिरीने प्रचारात उतरतील, असे समजते. महाराष्ट्रात त्याचा फायदा होईल. हरियाना सरकारने ५० दिवसांत घेतलेले १२६ निर्णय हे निकाल बदलणारे ठरले, असे मानले जाते. महाराष्ट्रातही भाजपने निर्णयांचा धडाका लावला आहे. या आधारावरच आगामी निवडणूक जिंकता येईल, असा सूर आज भाजपच्या कार्यालयात व्यक्त करण्यात येत होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.