गुटख्याची वाहतूक करणाऱ्याला सांगलीत अटक
९.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरातील जुना बुधगाव रस्ता परिसरातील नवीन आरटीओ कार्यालयाजवळ गुटखा, सुगंधित पानमसाला याची कारमधून वाहतूक करणाऱ्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून कारसह ९.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.
सचिन हणमंत शेलार (वय ४२, रा. वाल्मिकी आवास योजना, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या गुटखा, सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू याची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथक गुटख्याचा साठा, विक्री तसेच वाहतूक करणाऱ्यांचा शोध घेत होते.
पथकातील संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे यांना जुना बुधगाव रस्ता परिसरातील नवीन आरटीओ कार्यालयाजवळ एकजण कारमधून गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी एका कारमधून (एमएच ०९ डीए ४१८८) एक तरूण काही पोती नेत असल्याचे पथकाला दिसून आले. पथकाला संशय आल्याने ती कार अडवून तिची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये गुटखा आणि सुगंधी पानमसाला आढळला. त्यानंतर कारसह मुद्देमाल जप्त करून सचिन शेलार याला अटक करण्यात आली.
सांगली शहरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, संदीप कोळी, विनायक शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.